दोन्ही छत्रपतींनी एकत्र येऊन केंद्र सरकारवर दबाव टाकून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावे; शरद पवारांनी केले भाष्य!

Spread the love

पंढरपूर |  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज दिला. पंढरपूर येथील माजी आमदार सुधाकर परिचारक, प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी), जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी श्री. पवार पंढरपूरला आले होते. भेटीनंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.

खासदार पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. अशातच उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. यावर शरद पवारांना विचारले असता, त्या दोन्ही छत्रपतींनी आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. सातारचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही खासदार भाजप पुरस्कृत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिफारशीनेच त्यांची राज्यसभेत निवड झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या दोन्ही छत्रपतींनी पुढाकारा घ्यावा. केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी दाबव टाकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. कृषी विधयेकाच्या विरोधात विविध राज्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने चालू ठेवावे. केंद्राने कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे. शेती विधयेकामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. विधेयकासंदर्भात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करून काय निर्णय घेता येईल याचाही विचार सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.