Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

शरद पवारांनी तातडीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; महाविकास आघाडीत नेमकं चालले काय?

Spread the love

मुंबई  |  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नेमकं काय सुरु आहे यासंदर्भात उलट -सुलट चर्चा सुरु आहे . केंद्राने संसदेत सादर केलेली कृषी विधेयके आणि राज्यात कळीचा बनत चाललेला मराठा आरक्षणाचामुद्दा यासंदर्भात ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या भेटीचे कारण अद्यापही समोर आलेले नाही .शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली. सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री ठाकरे व पवार यांच्यात चर्चा झाली. या बैठकीनंतर पवार तसेच मुख्यमंत्र्यांच्या वतीने कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची महिती आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यादरम्यान मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याबाबत पुढे कोणती भूमिका घ्यायची व कायदेशीर लढाईची दिशा कशी असावी, याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात बहुतेक सर्वच पक्षांनी एकजुटीने हा लढा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. मात्र त्याचवेळी मराठा समाज मात्र आक्रमक झाला आहे.

राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडताना दिसत आहे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा, सुप्रीम कोर्टाच्या संबंधित पीठापुढे पुनर्विचार अर्ज दाखल करावा किंवा दिलासा मिळवण्यासाठी घटनापीठापुढे जावे, असे तीन पर्याय सरकारपुढे असल्याचे आधीच नमूद करण्यात आले आहे . या संपूर्ण स्थितीवर चर्चा करताना सरकारच्या विचाराधीन असलेल्या तीन पर्यायांवरही पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती आहे .

Exit mobile version