सोलापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांचे जगणे मुश्कील होऊन बसले असताना इकडे बार्शी शहरातील तुळजापूर रस्त्यावर असणाऱ्या मार्केट यार्डातील दुकानात काळ्या बाजारात जाणारी एक लाख 13 हजार 250 रुपयांची शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ यांनी भरलेली 50 किलोची 151 ठिकी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात रात्री उशीरा फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी आर. एस. दडके यांनी 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जीवन उद्धव काळदाते (रा. दत्तनगर), ज्ञानेश्वर रामदास पवार (रा.सांजा चौक, उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री सात वाजता मार्केट यार्ड गाळा क्रमांक 193 अ मध्ये घडली. संदेश पवार यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस उपअधिक्षक सिद्धेश्वर भोरे यांना महिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या पथकाने काळदाते ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकला. पोलिसांनी जीवन काळदाते यास रेशनचा स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ कोठून आणला विचारले असता ज्ञानेश्वर पवार याने दिला असल्याचे सांगितले. या धान्याची व्यापारामध्ये कसलीही नोंद, पावत्या नसल्याचे स्पष्ट केले. 76 ठिक्यांमध्ये 57 हजार रुपये किंमतीचा 3 हजार 800 क्विंटल तांदूळ तर 75 ठिक्यांमध्ये 56 हजार 250 रुपये किंमतीचा 3 हजार 750 क्विंटल गहू भरुन काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात ठेवण्यात आला होता. 151 ठिक्यातील गहू-तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे दिसून येत असून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन पंच तसेच महसूल विभागातील अधिकारी यांच्यासमोर पंचनामा करून तपासणीसाठी नमुने घेतले व धान्य शासनाच्या ताब्यात दिले. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत.