पुणेकर खुष; तब्बल 5 महिन्यांची प्रतीक्षा संपवून पहिल्या दिवशी 60 हजारापेक्षा प्रवाशांनी PMP मधून केला प्रवास!

Spread the love

पुणे | स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, भोसरी, पिंपरी आदी अनेक बस स्थानकांवर पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच प्रवाशांची खऱ्या अर्थाने वर्दळ सुरू झाली अन्‌ वाहतुकीतही बसचे प्रतिबिंब पडले. कोरोनामुळे धास्तावलेल्या प्रवाशांनी सॅनिटायझरचा वापर करीत प्रवासाच्या नियमावलीचे पालन केल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. सुमारे 60 हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी पहिल्या दिवशी बसचा वापर केला. 22 मार्चनंतर गुरुवारी प्रवासी वाहतूक सुरू झाली. शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 190 मार्गांवर पीएमपीने 477 बस सोडल्या. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. तसेच 120 शटल बसही सोडण्यात आल्या. प्रत्येक बसमध्ये कमाल 22 प्रवासी होते. सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान सुमारे 35 हजार प्रवाशांनी प्रवास केला अन् त्यातून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले. दुपारी ते रात्री दहा दरम्यानही 25 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचा पीएमपीचा अंदाज आहे.

पीएमपीच्या सर्व आगारांत सॅनिटायजरची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये प्रवाशांनी कोठे उभे राहायचे, यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. प्रत्येक सीटवर एकाच प्रवाशाला बसविण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. सिंहगड रस्ता, हडपसर, अप्पर इंदिरानगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, वाघोली, विश्रांतवाडी, भोसरी, पिंपरी, निगडी आदी मार्गांवरील बस थांब्यांवर सकाळपासूनच प्रवासी दिसत होते. पहिला दिवस असल्यामुळे प्रवासी संख्या कमी दिसत असली तरी, शुक्रवारपासून प्रवासी वाढतील, असा अंदाज जगताप यांनी वर्तविला.

प्रवासी मुकुंद ठोंबरे म्हणाले, ”के. के. मार्केट ते वैदूवाडी या मार्गावर मी प्रवास केला. मास्क असल्याशिवाय कंडक्‍टर बसमध्ये येऊ देत नव्हते, ही चांगली बाब आहे.” सुलभा कुंभार म्हणाल्या, ”चार महिन्यानंतर पहिल्यांदाच मी बसमधून प्रवास केला. सगळ्यांनीच मास्क लावला होता. बसमध्ये सॅनिटायजर होते. त्यामुळे प्रवास करताना बरे वाटले.” अमर सरत म्हणाले, ”मगरपट्टा- स्वारगेट दरम्यान मी प्रवास केला. प्रवासी संख्या मर्यादीत असल्याचे बसमध्ये दिसले. एरवी बसमध्ये गर्दी दिसते. पण, थोडेच प्रवासी असल्यामुळे सुरक्षित वाटले.” स्वारगेट – सासवड मार्गावरील कंडक्‍टर गणेश पाटील म्हणाले, ”बसच्या प्रत्येक फेरीनंतर संपूर्ण बस सॅनिटाईज करण्यात येते. प्रत्येक सीटवर एकाच प्रवाशाने बसावे, अशी सूचना आम्ही करतो. प्रवासीही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.”

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.