पुणे | खडकवासला धरणात सुमारे ६१ टक्के पाणीसाठा झाला असून, गुरुवारी दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. खडकवासला धरणात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. या धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, पानशेत ५४ मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला धरणात बुधवारी सायंकाळपर्यंत ६१ टक्के पाणीसाठा होता. गुरुवारी दुपारपर्यंत खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.