Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पुण्यातील गणेशोत्सवा बद्दल अजित दादांचा मोठा निर्णय!

Spread the love

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मानाचे गणपती आणि इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. तसेच, मेट्रो, पुरंदर विमानतळ यासह रखडलेली विकासकामे लवकर मार्गी लावावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. विधानभवन सभागृहात शुक्रवारी जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन आणि नियोजना’बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी कोणीही गर्दी करु नये.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलिस आणि महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन करणे, फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था आणि गणेश मूर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

Exit mobile version