Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल; वाचा सविस्तरपणे!

Spread the love

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांच्या सर्वाधिक 4.83 लाख चाचण्या पुणे जिल्ह्यात झाल्या आहेत. एकट्या पुण्यात आत्तापर्यंत 3.2 लाख चाचण्या झाल्या असून, त्यापैकी 62 हजार 37 कोरोना रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने नव्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यापासून इतरांना होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण ठेवणेही शक्य झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या चाचण्यांचे प्रमाण कमी केले असताना पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र हे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पुणे शहरात चाचण्यांचे प्रमाण दररोज सहा ते सात हजारांच्या आसपास आहे यात अटिजिन टेस्टचाही समावेश आहे.

पुण्यात मार्च ते जून या काळात चाचण्यांचे प्रमाण अत्यंत कमी होते, त्यामुळे रुग्णसंख्याही आटोक्यात आहे असे वाटत होते. जूनमध्ये शहरात एकूण 66 हजार 670 चाचण्या करण्यात आल्या त्यातून 10 हजार 758 रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात दीड लाखाहून अधिक चाचण्या करण्यात एकूण 36 हजार 838 नवे रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पुण्यात जुलै महिन्यात प्रत्येक आठवड्याला सरासरी 35 हजारांच्यावर चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्या जरी वाढलेली असली तरी, नव्या रुग्णांपासून आणखी संसर्ग रोखण्यासाठी त्याची मदत झाली आहे.

एक ऑगस्टनंतर पुण्यात लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली. साहजिकच त्यामुळे घरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या किती राहील याकडे आता महापालिकेचे लक्ष लागले आहे. ही संख्या आटोक्यात राहिली, तर मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल.एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येपैकी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 70 टक्क्यांवर राहिले आहे. एकट्या पुण्यात 43 हजार 606 रुग्ण बरे झाले आहेत.

Exit mobile version