पुणे | अव्वाच्या सव्वा बिले आकारण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी हॉस्पिटलने दीड लाख रुपयांच्या वरील रकमेचे बिल कोरोनाबाधित रुग्णांना दिले, तर त्या बिलाची आता पूर्व तपासणी होणार आहे. त्यासाठी शहरातील 30 हॉस्पिटलमध्ये बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून पथके स्थापन करण्यात आली आहे,” अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिली. कोरोना संदर्भात प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपयोजनांबाबत ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये राव यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाच्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहे. त्याच्या असंख्य तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना बिल देण्यापूर्वीच दीड लाखांपेक्षा अधिक बिल रूग्णालयांनी दिल्यास, त्यांची तपासणी प्रशासनाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी सौरभ राव म्हणाले, “खासगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी करण्यासाठी 28 लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच 8 उपजिल्हाधिकारी यांची सुद्धा नियुक्ती केली आहे. या सर्वांना जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. हे पथक शहरातील 30 खासगी हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करणार आहे. हॉस्पिटलमधील बिलांमध्ये अनेक तांत्रिक बाबी असतात. त्यामुळे बिलांची तपासणी करण्यासाठी चार डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचाराची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये असल्याने या मर्यादेतच बिलांची तपासणी केली जाणार आहे. बिलांची पूर्व तपासणी करण्यासाठी जादा वेळ लागला, तर रुग्णांना सोडण्यास उशीर होईल, अशी शंका हॉस्पिटलकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांना बिल आल्यानंतर एक तासाच्या आत बिलांची तपासणी करून त्याबाबतचा निर्णय कळविण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तेरुग्णांना दिले जाणार आहे, असेही राव म्हणाले. जम्बो हॉस्पिटल उभे राहण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत खासगी हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच आजपर्यंत 83 तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकांकडे आतापर्यंत खासगी हॉस्पिटलकडून जादा बिले आकारल्याप्रकरणी 83 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी 11 प्रकरणांमध्ये हॉस्पिटलकडून उत्तर देण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींची छाननी सुरू आहे, अशी माहिती राव यांनी दिली.