आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण, संजय गायकवाडांचा राडा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया?

Spread the love

आमदार निवासमधील कॅन्टीमध्ये मंगळवारी रात्री जोरदार राडा झाला. आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीमध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप करत कॅन्टीमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. मी गेल्या साडेपाच वर्षांपासून मुंबईमध्ये येत आहे. मी शक्यतो बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री जेवणासाठी डाळ, वरण, भात आणि चपातीची ऑर्डर दिली होती. मात्र डाळीचा वास येत होता, भात शिळा होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. यापूर्वी देखील तीनदा असाच प्रकार घडला होता, त्यावेळी मी मालकाला समज दिली होती, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.  मी विचारलं इथे कुक मॅनेजर कोण आहे? त्याने देखील वास घेतला, खूप घाण वास येत होता, मग त्यांना मी आपल्या स्टाइलमध्ये चांगला प्रसाद दिला असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.  दरम्यान मंगळवारी आमदार निवासमध्ये घडलेल्या या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे सगळ्यांना त्रास होऊ शकतो, ते जेवण खाल्ल्यामुळे त्यांना उलटी झाली म्हणून रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केलं. मात्र आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, कायदेशीर कारवाई करायचे अधिकार त्यांना आहेत. कोणालाही मारहाण करणं योग्य नाही.

मी संजय गायकवाड यांना समज दिली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र घडलेल्या या प्रकरणानंतर विरोधकांकडून संजय गायकवाड यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आली आहे, त्यांच्या निलंबणाची मागणी सुरू आहे, यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना रोज अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची संधी आहे, आणि सरकार म्हणून चर्चेला उत्तर देण्याची आमची तयारी असते. मात्र सभागृहात बोलण्यापेक्षा त्यांना बाहेर बोलण्यात जास्त रस असतो कारण तिथे कॅमेरे असतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.