आमदारांना चोळीबांगडी, पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा; मराठा मोर्चाचा सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम!
नाशिक | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आज महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. येत्या 2 डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास शरद पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच सर्व पक्षीय आमदारांना चोळीबांगड्या भेट देण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. त्यामुळे येत्या 2 तारखेनंतर राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच हवं: भुजबळ
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिलं पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं भुजबळांनी आज स्पष्ट केलं.
मराठा समाजाला ओबीसींमधून 5 टक्के आरक्षण देण्याची काही लोक मागणी करत आहे. काही लोक आम्ही ओबीसीच नाहीत असं म्हणत आहेत. तर काही लोक म्हणतात मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करा. वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होऊ शकतो. तसं वातावरण आहे, असं ते म्हणाले. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर त्यासाठी लढायलाच हवे. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठी आपल्याला भिडेवाड्यातून प्रेरणा घ्यायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.