Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रामध्ये गुगल क्लासरूम सुरू; देशातील पहिले राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे!

Spread the love

मुंबई | सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

‘वर्क फ्रॉम होम’साठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘गुगल’मुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही ‘गुगल’ने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी ‘गुगल क्लासरुम’ आणि ‘गुगल स्वीट’ च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की ‘गुगल’च्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.

‘गुगल’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक – उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी ‘जी स्वीट’  आणि राज्य शाळांकरिता ‘गुगल क्लास’ रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  ‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात,कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version