मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल बैठकांचे सत्र सोमवारपर्यंत सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लॉकडाऊनबद्दल निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा केली होती. याबैठकीमध्ये लॉकडाऊन किती दिवस लावायचा याबद्दल चर्चा झाली. परंतु, लॉकडाऊन बाबत बैठकांचे सत्र सोमवार ही सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थ खात्यासमवेत बैठक घेणार आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन लागू केल्यास इतर अर्थव्यवस्था काय परिणाम होणार तसंच गोरगरीब लोकांना लॉकडाऊन कालावधीत काही दिलासा देता येतो का यावर चर्चा होणार आहे.
14 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लॉकडाऊन किती दिवस लावावा यावर चर्चा झाली. कडक लॉकडाऊन सात दिवस करावे की 14 दिवस करावे यावर चर्चा झाली. काहींच्या मते पहिल्यांदा सात दिवस लॉकडाऊन जाहीर करावा पण काहींचे मते जाहीर करताना 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत राज्यात 14 दिवस लॉकडाऊन लागणार हे मात्र निश्चित आहे.
एसओपी तयार करणे सुरू..
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.
आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.