Spread the love

मुंबई | राज्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉक केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीनं हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अहवालाबाबत चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरु करण्याचा प्लॅन तयार आहे. वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचीही माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंटबाबतही निर्णयाची शक्यता

पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यात रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार आहे. तसंच 50 टक्क्याची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात प्राधान्य देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणार असल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असल्याचं कळतंय. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे.

केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या लसी पुरवठा धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. केंद्र सरकारने दिलेल्या 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्राकडून राज्याला दिल्या जाणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचं धोरण असल्याचंही नमूद केलं. यातून ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या लस तुटवड्याची जबाबदारी केंद्राकडे असल्याचं म्हटलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सुमारे 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हिडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.”

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.