मुंबई | अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, पुढचे सहा महिने ही बंधने राहतील, असे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दिले.
कोविडसंदर्भात औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागनिहाय जिल्ह्यांच्या आढावा बैठका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्या. मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटन आणि अन्य देशांत आता पुन्हा बंधने घालणे सुरू करण्यात आले आहे. आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरीत्या औषधांचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंंगवर भर द्यावा लागणार आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एका निश्चित मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. करोनावरील लस उपलब्ध होईल तेव्हा होईल, पण तोवर आपण उपचार पद्धती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करायचा आहे. समाजामध्ये दोन प्रकारचे लोक दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे. ही मंडळी मास्कच वापरत नाही आणि सोशल डिस्टन्सिंगही राखत नाही, असे लक्षात आले आहे. हा बेजबाबदारपणा इतरांसाठी घातक ठरू शकतो, याचे भान राखले गेले पाहिजे. त्याची त्यांना जाणीव करून दिली गेली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.