जळगाव | नुकताच भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे जिल्ह्यात राष्ट्रवादीला नंबर एकच पक्ष बनवण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आज (26 ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पाडवी यांच्यासोबत होते. यावेळी पाडवी आणि खडसे यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय गणितं, आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका तसेच नंदुरबारमधील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहीती आहे. या बैठकीत पाडवी यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहरप्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बी. के. पाडवी आदी नेते उपस्थित होते.
या शिष्टमंडळाने खडसे यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली. नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणितं कशी जुळवायची यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तसेच शहादा नगरपालिकांच्या निवडणुकांवरही प्राथमिक चर्चा झाली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या नावावरही यावेळी चर्चा झाली, अशी माहिती उदयसिंग पाडवी यांनी दिली. दरम्यामान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर एकनाथ खडसे यांनी कामाला सुरुवात केली आहे. दहा ते पंधरा माजी आमदार खडसे यांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच एकनाथ खडसे अनेक नेते, कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत असून ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.