महाराष्ट्राच्या सुपुत्राने स्वतः जीव धोक्यात घालून वाचवले 170 जणांचे प्राण!
नवी दिल्ली | केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचे विमान दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघातात आपल्या जीवाची बाजी लावून अनेकांचे जीव वाचवणारे कॅप्टन दिपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. कॅप्टन दिपक वसंत साठे हे एअर फोर्सचे टेस्ट पायलट होते. एअर फोर्सचे टेस्ट पायलट अनेक एयरक्राफ्टवर टेस्ट करत असतात. या अपघात झालेल्या विमानाचे पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार हे दोघे होते. कॅप्टन दिपक साठे हे फायटर पायलट होते. ते राष्ट्रीय सुरक्षा अकादमी NDA चे माजी विद्यार्थी होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता. वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमाने सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टननी आपला जीव गमावत जवळपास 170 लोकांचा जीव वाचवला. त्यामुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राने सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, दुबईहून कालीकत येथे येणारे एअर इंडियांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेले, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचे विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.