आवळा-मूर्ती लहान पण कीर्ती महान; जाणून घ्या ते कसे काय?

Spread the love

संपादकीय;

आवळे आता बाजारात दिसायला लागले आहेत. आवळा शरीराकरीता किती फायदेशीर आहे हे अनेकवेळा आपण वाचतोच. आवळा विटामीन सी चा उत्तम स्रोत आहे हे सर्वश्रुतच आहे. आयुर्वेदात आवळा वयस्थापन रसायन सांगितला आहे. म्हणजे अकाली वार्धक्य न आणणारा, शरीर क्षय भरून काढणारा आहे. इतके मोठे कार्य व महत्त्व आवळ्याचे आहे. सहा रसांपैकी ५ रस म्हणजेच मधुर अम्ल कडू तिखट तुरट हे रस आवळ्यात असतात. फक्त खारट / लवण रस आवळ्यात नसतो. अगदी बोटावर मोजण्या इतक्या वनस्पती अशा आहेत की ज्यात ५ रस असतात त्यापैकी १ आवळा आहे.

आवळा तिन्ही दोषांवर कार्य करतो. शरीराच्या प्रत्येक अवयवांवर आवळा उपयोगी ठरतो. रसायन असल्याने रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सप्तधातूंवर आवळा कार्यकारी आहे. वातपित्तकफ या त्रिदोषवर काम करणारा आवळा आहे. आवळा केश्य म्हणजेच केसांकरीता उत्तम सांगितला आहे. केस गळणे, केस पांढरे होणे, केस तुटणे, कोंडा अशा सर्व केसांच्या तक्रारींवर आवळा उत्तम औषध आहे. आवळ्याचे तेल, आवळा चूर्ण पोटातून घेणे, आवळ्याच्या काढ्याने केस धुणे अथवा आवळा लेप स्वरूपात केसांना लावणे अशा विविध रुपात आवळा उपयोगी ठरतो. केसांच्या तक्रारी दूर करून केस चमकदार, दृढ होतात.

आवळा उत्तम पित्तशामक आहे. अॅसीडीटी छातीत पोटात जळजळ होणे, मूत्र दाह किंवा त्वचेची आग होणे या तक्रारींवर आवळा सरबत, आवळा मुरब्बा ( मोरावळा ) खूप उपयुक्त आहे.

प्रमेहावर आवळा रस घेणे फायदेशीर आहे. ओली हळद व आवळा यांचा रस प्रमेह कमी करणारे आहे.

अरुचि अग्निमांद्य अम्लपित्त अशा सर्व पाचन विकारांवर आवळा उत्तम औषध आहे.

रक्तपित्त नाक फुटणे इ. व्याधींवर आवळा उपयोगी आहे.
दौर्बल्य अशक्तपणा भूक न लागणे अशा तक्रारींवर आवळा उत्तम लाभ करतो.

मोबाईल लॅपटॉप वर सतत काम केल्याने किंवा रात्री जागरणाने डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे असे त्रास होत असतील तर आवळा रसाचा डोळ्यांवर पिचू आराम देतो.

रक्ताल्पता यकृत विकार यामधे विविध औषधी चूर्णासह आवळा चूर्णाचा संयोग करून औषध तयार केले जाते. उदा. धात्री लौह

च्यवनप्राश, रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे व व्याधींना दूर करणारे उत्तम रसायन औषध आहे त्यात मुख्य घटक ताजे आवळेच असतात. त्यामुळेच आयुर्वेदतज्ज्ञ ताज्या आवळाफळाचा वापर करून उत्कृष्ट च्यवनप्राश बनवितात.च्यवनप्राश किती फायदेशीर आहे हे वेगळे सांगायला नको. स्त्रीरोग, मासिक स्त्राव जास्त होणे यावर आवळा फायदेशीर आहे. त्रिफळा म्हणजेच 3 फळांचे मिश्रण यात आवळाफळ एक घटक असतो. त्रिफळा चूर्ण हे देखील उत्तम रसायन, केस नेत्र याकरीता लाभदायक, पोट साफ करणारे, त्वक् विकारांवर श्रेष्ठ औषध आहे. आवळ्याचे हे सर्व गुण वाचून लक्षात येईल की स्वास्थ्य रक्षण व विकारशमन या दोन्ही गोष्टी आवळ्यामुळे शक्य आहे. म्हणूनच सिझनमधे आवळा नक्कीच घरी आणावा. ताज्या आवळ्याचा रस, मोरावळा, पाचक आवळा सुपारी, आवळा कँडी अशा विविध स्वरूपात सर्वांनाच आवडतो. च्यवनप्राश हे उत्तम रसायन आहे. आवळा आणि इतर अनेक औषधींपासून बनविले जाते. त्यात रसायन गुण योग्यप्रकारे बनविल्यानंतरच येतात. त्यामुळे आयुर्वेदतज्ज्ञाकडून अथवा तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घेऊनच च्यवनप्राश विकत घ्यावा. औषधी ज्ञान नसलेले किंवा गृहोद्योग करणारे चुकीच्या पद्धतीने किंवा कमी औषधांचा वापर करून च्यवनप्राश तयार करतात ते बरोबर नाही.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.