इंदापुर | पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीवर प्रशासक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडे विहित नमुन्यामध्ये पक्षनिधी जमा केलेल्या पावतीसह अर्ज करावेत.दि.20 जुलै पर्यंत आलेले अर्ज तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांकडे सादर करावेत,असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
दि.1 जुलै ते 31 डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्हातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या नेमणूकीसाठी शासनाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून,त्यसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधीकृत करण्यात आलेले आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या याद्या घेऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्याकडून पक्षनिधी म्हणून प्रत्येकी रू. 11 हजार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या पावतीसह याद्या दोन प्रतींमध्ये जमा कराव्यात, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागविल्याने सत्तेत असलेल्या शिवसेना व काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले असून त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर दिसत आहे.