Good News; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोने तारण कर्ज देणारी भारतातील पहिली शाखा बारामतीत सुरु!
बारामती | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच स्तरातील घटकांना आर्थिक चणचण भासत आहे. या परिस्थितीत आर्थिक उत्पन्न मिळण्याची शाश्वतीही राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तात्काळ सोने तारण कर्ज देण्यासाठी बारामतीत विशेष शाखा सुरु करण्यात आली आहे. या शाखेचं आज स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र मुख्य सरव्यवस्थापक दीपक कुमार लाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, सोने तारण कर्जासाठीची देशातील ही पहिलीच शाखा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोने तारण कर्ज देणारी भारतातील पहिली शाखा बारामतीत सुरु करण्यात आली आहे. 7 ते 7.65 टक्के व्याजदराने अवघ्या एका तासाभरात या शाखेतून सोने तारण कर्ज उपलब्ध होणार आहे. या शाखेचं उद्घाटन आज स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र मुख्य सरव्यवस्थापक दीपक कुमार लाला यांच्या हस्ते आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सरव्यवस्थापिका सुखविंदर कौर, पुणे विभागाचे व्यवस्थापक अबिद उर रहेमान, विभागीय व्यवस्थापक जोरा सिंग आणि बारामती शाखेच्या व्यवस्थापिका शिल्पा खराडे यांच्या उपस्थितीत झालं. आज पहिल्याच दिवशी या शाखेतून 51 जणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर प्रातिनिधिक स्वरुपात यावेळी मंजूरी पत्र देण्यात आले.
कोरोना कालावधीत अनेकजणांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. शाश्वत उत्पन्न नसल्यानं आणि बँकेचे व्यवहार थांबल्याने कर्जही उपलब्ध होण्यास अडचणी आल्या. या बाबी लक्षात घेऊन सोने तारण कर्ज हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं समोर आलं. त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सोने तारण देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन त्याची पहिली शाखा बारामतीत सुरु केल्याचं दीपक कुमार लाला यांनी सांगितलं. या शाखेत आज पहिल्याच दिवशी 51 जणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या शाखेचा प्रतिसाद पाहून पुढे देशभरात हा प्रयोग राबवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं
सोने तारण कर्ज योजनेसाठी स्वतंत्र शाखा सुरु करताना येथील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सोन्याची गुणवत्ता तपासणी आणि अन्य बाबी शाखेतच पूर्ण होतील. कागदपत्रांची पूर्तता आणि तपासणी होताच काही वेळातच संबंधित ग्राहकाला कर्जाची रक्कम दिली जाणार असल्याचंही दीपक कुमार लाला यांनी सांगितलं. तर यावेळी विकास लाड या ग्राहकाने काही तासात आपल्याला सोने तारण कर्ज मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने या निमित्तानं तात्काळ आणि अत्यल्प व्याजदरातील सोने तारण कर्जाची सुविधा देणारी पहिली शाखा बारामतीत सुरु केली. विशेष म्हणजे या शाखेला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा उपक्रम देशभरात राबवला जाणार आहे.