गुड-न्यूज; बारामतीमध्ये सुरू झालीय कोविड-19 वॉर रूम!
बारामती | कोरोनाच्या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने बारामतीत कोविड-19 वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचे समन्वयन करताना सर्व यंत्रणांचा समन्वयच नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या बाबत माहिती दिली. तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे वॉर रुम प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वॉर रूम 24 तास व आठवड्याचे 7 ही दिवस वॉर रुम कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
त्याचबरोबर शहरी किंवा ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला संस्थात्मक, गृह किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायचे, याबाबत व्यवस्थापन समन्वय समितीशी समन्वय ठेवणे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे, पोलिस विभागाशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीचे सीडीआर मिळविणे व संपर्क शोधणे, प्रतिबंधित क्षेत्राबाबतची नियमावलीची कार्यवाही होते की नाही, याबाबत पथके नेमून त्या बाबत देखरेख करणे, वॉर रुममध्ये आवश्यक स्टाफची नेमणूक करणे, उपलब्ध बेडची माहिती अभिलेख स्वरुपात तारिखनिहाय ठेवावी, अशा स्वरुपाचे निर्देश त्यांना देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.
कोरोनाचे समन्वयन करताना सर्व यंत्रणांचा समन्वयच नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, त्यांना पुरेशी आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अनेकांना नेमके काय करावे, हे समजत नसल्याने त्यांनाही याबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने ही वॉर रुम तयार करण्यात आली आहे.
या वॉररुमशी 02112-224386 या क्रमांकावर बारामतीकरांना संपर्क साधता येणार असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.