दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, आता फडणवीसांचाही प्लॅन ठरला, ते अस्त्र बाहेर काढणार?

मुंबई | आज मुंबईत ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. साधारण 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू विजयी मिळाव्यानिमित्त एकत्र आले. हाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते फडणवीस यांनी करून दाखवलं, असा टोला फडणवीसांना लगावला. आता राज ठाकरेंच्या याच विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा लावून धरलेला असताना फडणवीस यांनीही हिंदुत्त्वाचा उल्लेख करत मुंबई जिंकण्यासाठीच्या रणनीतीची एक झलक दाखवून दिली आहे.
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे मलाच मिळतील, असं फडणवीस म्हणाले. तसेचत मला सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचंही भाषण झालं, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठी भाषेबद्दल न बोलता. आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, असं ऐकायला मिळालं. हा मराठी चा विषयोत्सव नव्हता, ही रुदाली होती, असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला. पुढे बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पालिकेवर असलेली सत्ता यांचा उल्लेख करत मुंबईकरांचा पाठिंबा आम्हालाच आहे, असा विश्वास व्यक्त केला. गेली 25 वर्षे त्यांच्याकडे मुंबईची महापालिका होती. या 25 वर्षांत ते काहीच करू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आम्ही मुंबईचा जो चेहरामोहरा बदलवला त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पत्राचाळीतल्या, अभ्यूदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर त्याच ठिकाणी दिलं. याचीच असूया त्यांच्या मनात आहे, असे फडणवीस म्हणाले.
पालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा?
जनतेला सर्व माहीत असतं. मुंबईतला मराठी माणूस असो किंवा अमराठी माणूस हे सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. त्यासोबतच आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्त्वाचा अभिमान आहे. आमचं हिंदुत्त्व हे सर्वांना घेऊन चालणारं हिंदुत्त्व आहे, असे म्हणत फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचाही मुद्दा केंद्रस्थानी असेल, याचे संकेत दिले.