कळंब पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून निलंबित करावे; सर्व पक्षांयांचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार!
परवेज मुल्ला
उस्मानाबाद | कळंब शहर व तालुक्यात अवैध धंद्यांनी चांगलेच बस्तान बसविले असून चोऱ्या, लूट असे प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यास स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे.याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सर्व प्रमुख पक्षांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब शहर व तालुक्यात मटका, जुगार, चक्री, गावठी दारू असे अवैध धंदे जोरात चालू आहेत. चोऱ्या, दरोडा असे प्रकारही वाढले आहेत. काही दिवसापूर्वी कळंब शहरात अजय कर्नावट यांच्या दुकानावर दरोडा टाकून त्यांना गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्या घटनेची फिर्याद घेण्यासही कळंब पोलीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याची संतापजनक बाब समोर आली होती.
एकूणच शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून पोलिसांचे गुन्हेगारावर नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन यास जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून संबधीतावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी या सर्वपक्षीय निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा डॉ संजय कांबळे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव संजय घोगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, भाजप अनुसूचित विभागाचे सतपाल बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सहसचिव विकास गडकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर, बहुजन विकास मोर्चाचे राहुल हौसलमल, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख सचिन काळे, भीम आर्मीचे बाबासाहेब कांबळे आदींच्या सह्या आहेत.