बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने घेतला मोठा निर्णय!
लखनऊ | बलात्कार आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर छेडछाडीचे प्रकार घडले, त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याचे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात येणार आहेत. मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवतील, योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलून दोषींवर कारवाई करावी. त्याचसोबत यात जे गुन्हेगार दोषी आढळतील त्यांचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योगी सरकारने हे पाऊल उचललं आहे. जे आरोपी असतील त्यांचे पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करण्यात येईल. शहरातील प्रत्येक चौकाचौकात हे पोस्टर्स लावण्यात येतील. या आरोपींबद्दल संपूर्ण शहराला माहिती दिली जाईल, त्यामुळे यांच्यावर सामुहिक बहिष्कार टाकला जाईल, तसेच या आरोपींना मदत करणाऱ्यांवर दहशत राहील अशी योजना योगी सरकारने बनवली आहे.