मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय…
१) सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षी एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या परिणामी बाधित झालेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाच्या भरणा केलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२) मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना दिलासा देत म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणांनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरू केलेले नसलेले प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पांकरिता आरंभ प्रमाणपत्र मिळाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत भाडेकरू/रहिवासी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करून देणे म्हाडास बंधनकारक राहील.
३) महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ हजार ५०० कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देणार आहे.
४) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर-२०२० या कालावधीकरिता अख्खा चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ देण्यात येणार आहे.
५) राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व तीन दंत महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ याच महिन्यापासून होणार आहे.
६) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी लघु पाटबंधारे योजनेच्या २९० कोटी ३० लाख रुपये किमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे लांजा तालुक्यातील १२ गावांमधील १,४०७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे