मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वर्षभरात केले विक्रमी वाटप; रुग्णांनी केले कौतुक!

मुंबई | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १३ महिन्यांत कक्षाकडून १२०८५ रुग्णांना एकूण ९८ कोटी ९८ लाख रुपयांची मदत दिली आहे.
या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य मिळत असल्याने आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्याने जास्तीत गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच श्री. शिंदे यांनी त्वरित सुरू करत या योजनेचे मूळ संकल्पक असलेल्या मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुख पदी निवड केली होती. पहिल्या दिवसापासूनच श्री चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.
त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात १७९ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी ०१ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९3 लाख, एप्रिल २०२३ मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे २०२३ मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, जून २०२३ मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, तर जुलै मध्ये विक्रमी १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो असे कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी शेवटी सांगितले आहे.