मंचर | “अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि मी ही मुख्यमंत्री झालो. हा चमत्कार शिवनेरीच्या भूमीतला मी अनुभवला आहे. शत्रू बरोबर कसे लढावे, याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला वेळोवेळी छत्रपती शिवरायांनी दिली आहे. त्यामुळे मी कोणत्याही संकटाला कधीही घाबरत नाही. कारण या मातीतील तेज आणि प्रेरणा माझ्या बरोबर आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुणे जिल्ह्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या महाद्वाराचे ऑनलाईन उदघाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत आहेत- LIVE
लाइव्ह पहा: https://t.co/1Nt9oenmPG pic.twitter.com/iDlQbAwKo6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 21, 2020
मंचर येथील शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ तसेच मंचर ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून २८ लाख रुपये किंमतीच्या व्हेंटिलेटरसह अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दि.२१ ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी सारंग कोडवलकर, सुरेश गोरे, माऊली आबा कटके, देवेंद्र शहा, हर्षद मोरडे, सुरेश भोर, देविदास दरेकर, सुनील बाणखेले, अरुणा थोरात, अरुण गिरे, राजाराम बाणखेले, शिवाजीराव राजगुरू, उपसरपंच धनेश मोरडे, सागर काजळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे उपस्थित होते.
राम मंदिराचा प्रश्न कोल्डस्टोरेजमध्ये थंड झाला होता, असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी भाजपला लावला. ठाकरे म्हणाले, ”शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निमित्ताने या भागात अनेकदा आलो आहे. त्यामुळे या भूमीचा परिसर आणि ताकद मला माहित आहे. राम मंदिराचा प्रश्न मार्गीच लावायचा या जिद्दीने आणि इर्षेने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवनेरीवर आलो. येथील माती माथ्याला लावली. शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक घेऊन थेट अयोध्या गाठली. त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायलयात दावा सुनावणीला येऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जनतेचे राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले. नोव्हेंबर २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर ही मी शिवनेरीवर आलो होतो. या मातीचा चमत्कार मी अनुभवला आहे. कारण या परिसरात शिवरायासह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, हुतात्मा बाबू गेनू, हुतात्मा राजगुरू यांचा पदस्पर्श आहे.”