ठाकरे सरकारचे गुढीपाडवा गिफ्ट; महाराष्ट्र निर्बंधमुक्त!
मुंबई | राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्याने लावण्यात आलेले निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, मास्क घालणं हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गुढीपाडवा, राम नवमी, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजेश टोपे म्हणाले, राज्यातील २ कायदे लागू केले होते, त्यातून आपण महामारीत निर्बंध लावले होते. ते आता काढण्यात आले आहे. ५० टक्के लोक बस-ट्रेनची क्षमता होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मास्क घालणे बंधनकारक नसले तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार इतरांची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क वापरावा. हे निर्बंध हटवण्यात आले, याचा अर्थ असा नाही बिनधास्त वावरावे, मास्क ऐच्छिक जरुर आहे, त्यामुळे लोकांनी आपली आणि लोकांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा, असा निर्णय आज घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शोभायात्रा साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे. मेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.