एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम
डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढताना झालेल्या फसवणुकीच्या अनेक घटना मध्यंतरीच्या कालावधीत समोर आल्या होत्या. त्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता १० हजारांपेक्षा अधिक रोकड एटीएममधून काढतानाही तुम्हाला ओटीपीची आवश्यकता भासणार आहे. सध्या रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी हा नियम लागू आहे. परंतु आता दिवसभरासाठी हा नियम लागू असणार आहे. १८ सप्टेंबरपासून देशभरात स्टेट बँकेकडून हा नियम लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, बँकेनं आपल्या सर्व ग्राहकांना त्वरित आपला मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची विनंती केली आहे.
ग्राहकांच्या खात्याची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीकोनातून स्टेट बँकेनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. १ जानेवारी पासून बँकेनं रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताना ओटीपी आधारित सेवा सुरू केली होती. परंतु आता ओटीपी आधारित सेवा चोवीस तासांसाठी लागू असणार आहे. म्हणजेच आता एटीएमच्या पीनसह ग्राहकांना आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपीही टाकावा लागणार आहे.
ओटीपी सेवेद्वारे एटीएममधून पैसे मिळण्याची सुविधा सुरू केल्यानंतर ग्राहकांच्या खात्याची अधिक सुरक्षा होणार आहे. तसंच यामुळे कार्डधारक, अधिक पैसे काढणे, कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि अन्य प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करु शकतील, असं मत स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ( रिटेल आणि डिजिटल बँकींग) सी.एस.शेट्टी यांनी सांगितलं. जर ग्राहक कायम १० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढत असतील तर त्यांनी त्वरित आपला मोबाईल क्रमांक अपडेट करावा, असंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे.