मुंबई : गेल्या 5 महिन्यापासून बंद असलेली लालपरी उद्यापासून पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. राज्यातील आंतरजिल्हा एसटी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची गरज लागणार नाही. सुरुवातीला अंशत: एसटी सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने ही सेवा वाढवली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
कोविड१९ च्या काळात महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. मधल्या काळात जिल्ह्याच्या सीमा न ओलांडता सेवा सुरू करण्यात आली. आज महाराष्ट्र पूर्वपदावर येत असताना आंतरजिल्हा सेवेचा पुन:श्च हरी ओम करण्यात येत असून लालपरी पुन्हा पूर्वीप्रमाणेच सेवा देणार आहे. pic.twitter.com/I64T3F0C2z
— Anil Parab (@advanilparab) August 19, 2020
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 5 महिन्यांपासून एसटीची आंतरराज्य आणि राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी आंतरजिल्हा बससेवा उद्या 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.