इंदापूर तालुक्यातील भिगवण कोरोना सेंटरच्या उदघाटनाचा नवीन वाद; राज्यमंत्री भरणेंच्या आधीच भाजपने केले उद्घाटन!

Spread the love

भिगवण | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी- भाजपच्या नेत्यांचा वाद इंदापुर तालुक्याला नवीन नाही परंतु हा वाद आता थेट कोरोनावर पोचला. कोरोनाने देश तसेच जगात कोणालाच सोडले नसले तरी आज इंदापूर तालुक्यात मात्र थेट कोरोनाचाच वाद राजकारणाने केला. भिगवण मध्ये कोरोना केअर सेंटरचे आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते नियोजित उदघाटन संध्याकाळी होणार असतानाच भाजपने हे सेंटर आम्हीच आणले असा दावा करीत दुपारीच त्याचे उदघाटन करून टाकले. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनी या कोविड केअर सेंटरचे उदघाटन केल्याने आता इंदापूर तालुक्यात राजकीय वादापुढे कोरोनाची देखील खैर राहीली नाही असेच चित्र निर्माण झाले.

कोरोनाचा वाढता प्रभाव बघता इंदापुर तालुक्यात निमगाव केतकी व भिगवण येथे कोविड सेंटर उभारणी चे काम पूर्ण झाले असता आज भिगवण येथील ट्रामा सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. याचे औपचारिक उदघाटन आज संध्याकाळी वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे करणार होते. त्याची तयारीही त्यानुसार सुरू होती. मात्र हे सेंटर आम्हीच पाठपुरावा करून आणले व मागणीही आम्हीच केली होती असा दावा करीत भाजपच्या वतीने इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापतींनी अचानकच त्याचे उदघाटन करून टाकले व आमच्या कामाचे आम्हीच उदघाटन करणार असा दावा केला.

दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना पुढील गोष्टी निदर्शनास आल्या.

– सचिन बोगावत, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
कोरोनाचे कोणीही राजकारण करू नये. भिगवणमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परीषदेचे सदस्य आहेत. मुळात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून आम्ही हे सेंटर सुरू व्हावे म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. राज्यमंत्री भरणे यांनी सर्व पाठबळ दिले.अगदी टँकर सुरू करण्यापासून, खो आणण्यापासून आम्ही नियोजन केले आहे. या सेंटरचे औपचारिक उदघाटन आम्ही करण्यासाठी सभापती, उपसभापतींना नियमानुसार आमंत्रण दिले होते. मात्र कोरोनाच्या काळात अडचणी सोडवायच्या बाजूला राहून उदघाटनाच्या नावाखाली स्टंटबाजी करण्यात आली, हे दुर्दैवाचे आहे. या तालुक्यातील विकासासाठी राज्यमंत्री निधी आणत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी अशा पध्दतीचे राजकारण करणे गैर आहे.

-संजय देहाडे, उपसभापती, पंचायत समिती, इंदापूर
हे ट्रामा सेंटर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीच त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात मंजूर करून आणले होते, त्याच्या कामाला मागील पाच वर्षात कधी गती दिली नाही. आताही भिगवण एका बाजूला असल्याने व तेथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भाजपनेच कोविड केअर सेंटर होण्यासाठी पुढाकार घेतला होता व त्यासाठी पाठपुरावाही केला होता, मात्र त्याचे राजकारण करून तेथे उदघाटनाचा घाट घातला जात होता. त्यामुळे आम्ही त्याचे रितसर उदघाटन केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.