भिगवणचे हॉटेल व्यवसाईक आणि नागरिक त्रस्त; पुन्हा 14 दिवस भिगवण बंदची हाक!
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तसेच सातारा-अहमदनगर राज्य महामार्गावरील नेहमी वर्दळीच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्वपूर्ण चौफुल्याचे ठिकाण असणाऱ्या मदनवाडी या ठिकाणी अखेर कोरोनाने प्रवेश केला आहे. आजअखेर मदनवाडीकरांनी मोठया शर्थीने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले होते. त्यामुळे अनेक बुद्धिवंतांना “आश्चर्याचा पण काहीसा अनपेक्षित सुखद धक्का” ही बसलेला होता.
कारण मदनवाडी गावामध्ये परगावावरून येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांचे,पोटापाण्याच्या सोयीसाठी शहरांमध्ये,परराज्यांमध्ये जाणाऱ्या काही लोकांचे येणे जाणे मोठ्या प्रमाणात होते. त्यातूनच कोरोना महामारीच्या प्रारंभीच पुण्याहून आलेल्या एका वृद्ध महिलेला संशयित म्हणून तपासण्यात आले होते. परंतु सदर महिलेला कोणतीही लक्षणे न दिसल्याने मदनवाडीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मदनवाडीमध्ये काल रात्री एक वयोवृद्ध प्रसिद्ध हॉटेल मालक अखेर कोरोना पॉझिटिव्ह निघाला. संबंधित रुग्णाला यापूर्वी मधुमेह आणि रक्तदाब याचा त्रास असून ते पुणे येथे नेहमीच्या नियमित तपासणीकरिता दि.14 जुलै रोजी पुणे येथे गेले होते .त्यानंतर 15 जुलै रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते 16 जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे तपासणीसाठी गेले होते. काल दिनांक 17 जुलै रोजी रात्री त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. पुणे येथील “औंध” या ठिकाणी त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जवळच्या संपर्कातील 8 व्यक्तींचे स्वाब इंदापूर येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. संपर्कातील इतर 15 लोकांचे घरीच विलगिकरण करण्यात आले आहे.
तसेच यापूर्वीच मयत झालेल्या भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील एकूण 17 लोकांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील भिगवनमधील एका डॉक्टरांचा अहवाल आज निगेटिव्ह आलेला आहे. इतर 16 लोकांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. त्या महिलेच्या संपर्कातील 50 लोकांना घरीच विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी “न्युज प्रारंभ” बोलताना दिली.
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मदनवाडी गावातील सर्व व्यवसाय 14 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी असे आवाहन भिगवण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज दिवसभर करण्यात येत आहे.