बारामतीचा होणार कायापालट; स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल!
बारामती | येत्या काही महिन्यात बारामतीचे रंगरुप पालटण्यास प्रारंभ होणार आहे. बारामतीतील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पास येत्या काही दिवसात प्रारंभ होणार असल्याने बारामतीच्या वैभवात भर पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत अनेकविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. यात नीरा डावा कालवा सुशोभिकरण व मजबूतीकरण, कहा नदी स्वच्छता व सुशोभिकरण, तीन हत्ती चौकाचे सुशोभिकरण, भिगवण रस्त्याचे सुशोभिकरण, शहरातील रिंग रोडची व शहरातंर्गत रस्त्याची कामे मार्गी लावणे, बारामती बसस्थानकाची नव्याने उभारणी, पोलिस मुख्यालयाचे काम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस ठाण्याची नवीन इमारत, शिवसृष्टी उभारणे, श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे नूतनीकरण व संग्रहालय उभारणी, बारामतीचे शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे रुग्णालय पूर्णत्वास नेणे अशी अनेक कामे होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही विकासकामांवर परिणाम होऊ
द्यायचा नाही, अशी शासनाचीच भूमिका असल्याने त्या पध्दतीने बारामतीतही विकास कामांची गती कायम आहे. बारामती शहराबाहेरील रिंग रोडचे जाळे हा अजित पवार यांच्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाहेरून येणा-या कोणत्याही व्यक्तीस शहरातून जावे लागू नये, वेळ व अंतरही कमी व्हावे आणि वेगाने बाहेर जाता यावे, या उद्देशाने सर्वच रिंग रोडचे जाळे मजबूत होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून, 500 खाटांच्या
क्षमतेचे रुग्णालयही वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह कोणत्याही उपचारासाठी शक्यतो पुण्याला जावे लागू नये, असा या मागचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. 13 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसहीत सीटीस्कॅन, एमआरआय, डायलिसीस सुविधाही येथे शासकीय दरात उपलब्ध होणार आहेत. शहरातील नीरा डावा कालव्याच्या मजबूतीकरणासह सुशोभिकरणाचेही काम वेगाने सुरु आहे. परकाळे बंगला ते जळोची साठवण तलावापर्यंत दोन्ही बाजूला मुरुम भरुन मजबूतीकरण सुरु झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कालव्याचे सुशोभिकरण करण्याचे काम नियोजित होते.
आता मात्र प्रत्यक्षात याला प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे कहा नदीच्याही सुशोभिकरणाच्या दृष्टीने काम सुरु झाले असून, स्वच्छता करण्यात येत आहे. बारामतीचे बसस्थानकही आगामी 25 वर्षात बारामतीची वाढणारी लोकसंख्या विचारात घेता नव्याने उभारले जाणार आहे. बसस्थानकाची रचना करताना प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने प्रयत्न सुरु असून, लवकरच याही कामास प्रारंभ होणार आहे. शिवसृष्टीची उभारणी व श्रीमंत बाबूजी नाईक – वाड्याचे नूतनीकरण व बारामतीचा वैभवशाली इतिहास जतन करुन ठेवण्याचेही काम सुरु आहे अश्या प्रकारे अनेक कामांना गती मिळत असून बारामतीचा स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे बोलले जात आहे.