अयोध्या | आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले. तब्बल 29 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ मोदींनी पूर्ण केली, जवळपास 40 मिनिट चाललेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची उपस्थिती होते. भूमिपूजनानंतर मंदिराचे निर्माण कार्य आता सुरु होणार आहे. मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत.
मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. शिवाय मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येईल. मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट होती. आता ती 280 ते 360 फूट करण्यात येईल.
मंदिर उभारणीसाठी नक्की किती खर्च येईल, याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, राम मंदिराच्या उभारणीसाठी जवळजवळ 300 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय मंदिर परिसरातील पूर्ण जमिनीचा विकास करण्यासाठी 1000 करोड रुपये खर्च येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, रामलल्लाच्या जून्या मूर्त्याच नव्या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येणार आहेत. सध्या त्यांना मानस भवनमध्ये तात्पूरतं ठेवण्यात आलं आहे. मंदिर बांधूम पूर्ण झाल्यानंतर रामलल्लाची मंदिरात स्थापना करण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.