Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा; डॉ अमोल कोल्हे यांचे मोदींना निवेदन!

Spread the love

पुणे | साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी असणाऱ्या स्व. अण्णाभाऊ साठे यांची यंदा जन्मशताब्दी असल्याने समाजाच्या सर्वच थरातून त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून साहित्यसम्राट स्व. अण्णाभाऊंच्या लोकशाहीर, सामाजिक प्रबोधक म्हणून पददलित, वंचित, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा दूर करण्यासाठी वेचलेले आयुष्य अतिशय प्रेरणादायी असून यंदा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, जाणिवांनी ओतप्रोत भरलेला सामाजिक परिवर्तनकार, वंचित -शोषितांचा आवाज, सत्यशोधक तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील स्व. अण्णाभाऊंचे योगदान, साहित्य क्षेत्रातील मोलाची कामगिरी ही भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक व प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करून राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. त्यासाठीच मी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या संदर्भात राज्याकडून रीतसर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी आशाही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version