Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोना नसणाऱ्या रुग्णांच्या उपचारांच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करा; डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी!

Spread the love

पुणे | महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील नॉन कोविड रुग्णांच्या उपचारांच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

कोविड – १९चा संसर्ग भारतात सुरू झाल्यापासून महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजनांतर्गत हृदयविकार, किडनी, महिलांची प्रसुती, गर्भाशयाचे आजार यासह विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या कोरोना नसणाऱ्या रुग्णांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही चाचणी आवश्यक असली तरी अनेकदा या आजारांमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु या चाचणीचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश नसल्याने रुग्णालय व्यवस्थापन कोविड चाचणी करण्यासाठी आकारत असलेले शुल्क गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचे असते. अशावेळी कोविड चाचणी केंद्रावर जावे लागल्यास तेथे कोविडची लक्षणं असलेल्या रुग्णांच्या सानिध्यात आल्यास अशा रुग्णांना धोका होण्याची शक्यता असते.

या संदर्भात अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधून या दोन्ही जन आरोग्य योजनांतर्गत केल्या जाणाऱ्या सवलतीतील उपचारांच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या विनंतीची तातडीने दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवले असून कोरोना नसणाऱ्या रुग्णांवरील उपचारासाठीच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version