शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू!
मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पुणे भेटीचं निमंत्रण दिलं आहे. येत्या सप्टेंबरमध्ये शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पवार-शहा यांच्या या दौऱ्यातून राष्ट्रवादी-भाजपच्या जवळकीत गोडवा निर्माण होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. शहांना पुण्यात बोलावून पवार काय काय साध्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्द्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी पवारांनी शहांना थेट महाराष्ट्र भेटीचं निमंत्रण दिलं आहे. पवारांच्या या निमंत्रणावरून शहा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत.
पवारांचं निमंत्रण का?
या भेटीत अमित शहा यांनीच पवारांना आपण सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात येत असल्याचं सांगितलं. वैकुंठभाई मेहता संस्थेत येत असल्याचं शहा यांनी पवारांना सांगितलं होतं. त्यामुळे पवारांनी त्यांना पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये येणाचं निमंत्रण दिलं. त्याला शहा यांनी सकृतदर्शनी होकार दर्शविला आहे. त्यामुळे शहा-पवार यांच्या जवळकीवर चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी गेल्याच महिन्यात 17 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच 3 ऑगस्ट रोजी शहांची भेट घेतली. या पंधरा दिवसांच्या भेटीत काही लिंक असावी, अशी शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.
काँग्रेस गॅसवर?
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात विरोधकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सर्व विरोधकांना नाशत्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी विरोधकांसह संसदेपर्यंत सायकल रॅलीही काढली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मात्र, हे चित्रं असतानाच पवारांनी शहांची भेट घेऊन काँग्रेसलाही गॅसवर ठेवलं आहे. त्यातच पवारांनी शहांना पुणे भेटीचं निमंत्रण दिल्याने या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.