Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आरोप-प्रत्यारोप:- ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार!

Spread the love

पुणे | शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यामुळेच ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’, अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फटकारले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

पाटील यांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. आधी हसन मुश्रीफ यांनी आणि आता अजित पवार यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला. मी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे संक्षिप्त रूप ‘चंपा’ असे केले. ते आता राज्यभर झाले आहे, असे सांगतच अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. ‘चंपा’चे शरद पवार यांच्याबद्दलचे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, असेच मी म्हणेन. ते सध्या काहीही बरळायला लागले आहेत, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला. पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. म्हणूनच ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असेही अजित पवार म्हणाले

Exit mobile version