राज्यात होळी, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, जाणून घ्या आपल्या आपल्या शहरातील नियम?
मुंबई | होळी म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन किंवा धूळवड खेळली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबईत होळी साजरी करण्यावर निर्बंध
मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धुलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
पुण्यात होळी, धुलिवंदन साजरा करण्यास बंदी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी आणि धुलिवंदन सण/उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागांवर होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. तसेच जे कोणी आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गात पालखी घरोघरी नेण्यास मनाई
सिंधुदुर्गात शिमगोत्सव आणि होळी साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना करण्यात जारी करण्यात आली आहे. होळी आणि धुलिवंदन या ठिकाणी 50 लोकांच्या उपस्थित साजरे करावेत. मंदिर विश्वस्त, मानकरी, पालखीधारक यांना RTPCR चाचणी बंधनकारक आहे. पालखी घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. धुलिवंदन आणि रंगपंचमीत रंग उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कल्याण रंगपंचमी साजरी करणाऱ्या सोसायटींवर देखरेख
कल्याण-डोंबिवलीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यावर महापालिकेने निर्बंध लावले आहेत. तसेच सोसायटीच्या आवारात होळी अथवा रंगपंचमी साजरी करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
लातूरमध्ये होळी घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन
लातूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाहता होळी आणि धुलिवंदन घरच्या घरी साजरे करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. होळी आणि धुलिवंदन हे सण घरी कुटुंबासोबत साजरे करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जळगावात मंगळवारपर्यंत निर्बंध
जळगावात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळो कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर जळगावात पुढील तीन दिवस निर्बंध लावण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री 12 पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
नागपुरात होळीसाठी कडक निर्बंध
नागपुरात कोरोनाची वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता होळी सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण अर्थचक्र सूर ठेवण्यासाठी काही शिथिलता देण्यात आली. होळीसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागपुरात सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी होळी, धुलिवंदन आणि शब ए बारात साजरी करण्यास मनाई असणार आहे. तसेच ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यास मनाई असणार आहे. त्याशिवाय एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मज्जाव असणार आहे.
गडचिरोलीत होळी, धुलिवंदन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
राज्यात सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. उद्या 28 मार्चला होळी आणि 29 मार्चला धुलिवंदन उत्सव साजरा केला जात आहे. यावेळी नागरिक मोठया प्रमाणात एकत्रित आल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर होळी, धुलिवंदन सण कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
नंदूरबारमध्ये होळी, धुलिवंदन कार्यक्रम मनाई
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यात मनाई करण्यात आली आहे. तसेच तिथीनुसार शिवजयंती उत्सव मिरवणूक मेळावा रॅली आणि व्याख्याने मनाई घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात काठी येथील राजवाडी होळी आणि धडगाव तालुक्यातील होळी सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो. त्यामुळे लोकांची गर्दी होत असते. मात्र सर्व उत्सव रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पनवेलमध्ये होळी, धुलिवंदन साधेपणाने साजरा करण्याचे आदेश
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आली आहे. होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, ईस्टर संडे साधेपणाने साजरे करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
मीरा भाईंदरमध्ये होळी, धुलिवंदन साजरा करण्यास मनाई
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच खाजगी परिसर सोसायटी किंवा संकुलाच्या आवारात होळी, धुलिवंदन तसेच रंगपंचमी हे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी या सण सार्वजनिक तसेच खाजगी परिसरात अथवा सोसायटी अथवा इमारती संकुलामध्ये कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हॉटेल्स रिसोर्ट, सार्वजनिक सभागृह, सार्वजनिक आणि खाजगी मोकळ्या जागेत साजरी होणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे.