बारामतीकरांना कोरोनासंदर्भात परिपूर्ण माहिती देण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची नितांत गरज,स्मार्ट बारामती?
बारामती | शहरात सध्या कोठे ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत, कोणत्या रुग्णालयात किती जागा शिल्लक आहेत, रुग्णाला तातडीने रुग्णवाहिकेतून हलवायचे आहे, व्हेंटीलेटर कोठे मिळू शकेल, डायलिसीस कोठे होऊ शकेल… या व यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे कोठे मिळवायची, हेच बारामतीकरांना समजेनासे झाले आहे. त्रास होतो आहे, स्वॅब द्यायला नेमके कोठे जायचे, तेथे कोणाला भेटायचे, सोबत काय कागदपत्रे न्यायची, तेथे किती वेळ लागेल, पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर पुढे काय करायचे, अचानकच त्रास वाढला तर पुढची सोय काय असू शकेल… या प्रश्नांची उत्तरेही कोणी द्यायची, हे कोणालाच माहिती नाही.
बारामतीतील शासकीय सेवेतील डॉक्टर आणि खाजगी डॉक्टरही जीव तोडून काम करत आहेत, मात्र ज्या समन्वयाची आवश्यकता आहे, तो कोठेही दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकांची अवस्था तर कोणी वालीच नाही, अशी झाली आहे. अनेकांना स्वॅब देण्यासाठी गेल्यानंतर, “नंतर या’ किंवा “रुई रुग्णालयातून सिल्व्हर ज्युबिलीला जा’ असे सांगितले जाते. जेथे परिपूर्ण व खात्रीची माहिती मिळेल, अशी हेल्पलाईन बारामतीत नसल्याने सगळी गोंधळाची परिस्थिती आहे.
बारामतीकरांना कोरोनासंदर्भात परिपूर्ण माहिती देण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची नितांत गरज आहे.
हे करण्याची गरज
– तातडीने 24 x 7 हेल्पलाईन
– स्वॅबसंदर्भातील माहितीसाठी स्वतंत्र क्रमांक
– रुग्णवाहिका समन्वयनासाठी स्वतंत्र क्रमांक
– दवाखान्यात कोठे जागा शिल्लक आहे, याची दैनंदिन माहिती
– कोरोनानंतर रुग्ण व नातेवाईकांनी काय काळजी घ्यायची याची माहिती
– विलगीकरणाच्या प्रक्रियेची माहिती
– रुग्णाला पुण्याला हलविण्याची वेळ आल्यास तेथे बेड उपलब्धतेसाठी मदत
– रुग्णालयांच्या बिलासंदर्भात पडताळणीची सुविधा
नागरिकांना परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणे गरजेचे आहे. याबाबत येत्या दोन- तीन दिवसांत सर्वांशी चर्चा करून ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करू.
– डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.