12 जुलै 1961, पुण्याच्या इतिहासातील काळरात्र; जरूर वाचा!
पुणे | 12 जुलै; पुण्याच्या इतिहासातील काळरात्र
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत आणि खडकवासला धरण फुटल्याचा घटनेला आज ५९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 12 जुलै 1961 या दिवशी हे धरण फुटून धरणातील सर्व पाणी पुणे शहरात घुसून हाहाकार माजला होता. 12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक निशाणी अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे. ‘160, नारायण पेठ’ ही चार मजली इमारत. त्या दिवशी या इमारतीच्या तिस-या मजल्यापर्यंत पाणी आले होते.
आदल्या दिवशीच्या रात्रीच (11 जुलै) पोलिसांच्या एका वायरलेस गाडीने धोक्याची पूर्वसूचना दिली होती. परंतु तरीसुद्धा नागरिकांनी आपली घरे सोडली नव्हती. दुस-या दिवशी (12 जुलै) सकाळी दहा वाजल्यापासून पाणी हळूहळू वाढत गेले. तेव्हा आताच्या सारखी घरे नव्हती. लकडी पुलाच्या पलिकडे शेती होती तर अलीकडे अनेक चाळवजा घरात कुटुंबीय राहत होती.
लकडी पूल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेला आणि मग मात्र लोकांची पाचावर धारण बसली. पाहता-पाहता पाण्याने रौद्ररूप धारण करत लकडी पुलाशेजारी असलेली घरे गिळंकृत करण्यास सुरुवात केली. घरे मातीची असल्यामुळे त्या वाहत्या पाण्यात गोल फिरत आणि दिसेनाशी होत. दिसेनाशी होताना मातीचा धुराळा आकाशात उंच उडत होता. त्यानंतरचे चित्र मात्र ह्रदय पिळवटून टाकणारे होते. त्या अजस्र लाटेसोबत स्त्री, पुरूष, लहान मुले आणि संसारपयोगी साहित्य वाहून जाताना पाहण्याशिवाय आमच्याकडे तेव्हा काहीही पर्याय नव्हता.
त्या दिवशी जिवाच्या आकांताने सैरावैरा धावत 250 पेक्षा अधिक नागरिक या इमारतीत जमा झाले होते. मुसळधार पावसातही गच्चीवर लहान मुले, स्त्रिया, पुरूष देवाचा धावा करत इमारत तग धरण्यासाठी प्रार्थना करत होते. त्या दिवशी आम्ही आमच्या गच्चीतून कित्येकांना वाहून जाताना पाहिले. काठीच्या आधारे काहींना गच्चीतून आत ओढूनही घेतले. परंतु आम्हाला नाईलाजाने सर्वांनाच वाचवता आले नाही. नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, जंगली महाराज रस्ता या मार्गावरील इमारती धडाधड पाण्याखाली गेल्या. हजारो माणसे फर्ग्यूसन कॉलेज आणि पर्वतीच्या टेकडीवर आश्रयाला जाऊन बसली. पानशेत धरण फुटल्याची बातमी हा हा म्हणता पसरली. त्यावेळी वाहिन्या नव्हत्या. परंतु, बातमी सर्वत्र गेली. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र राज्य होताच महाराष्ट्रावर आलेले हे फार मोठे संकट होते.
सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेला पुराचा कहर सायंकाळी सहा वाजेपर्यंत असाच होता. त्या दरम्यानच्या काळात आम्ही साक्षात मृत्यू पाहिला होता. सायंकाळी सहानंतर हळूहळू पूर ओसरण्यास सुरुवात झाली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विजय थिएटरच्या चौकात डोक्यावर बत्ती घेतलेले काही लोक दिसले. त्यांनी आमच्याकडे येत एकेकाला बाहेर काढण्यास सुरुवात केली. बाहेर पडताच प्रत्येकांनी जीव वाचल्याच्या आनंदात वाट दिसेल तिकडे धूम ठोकली. या पुरामध्ये पुण्यातील बंडगार्डनचा पूल सोडला तर बाकी सगळे पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुण्याचा संपर्कच तुटला होता. पुण्यात एक महिना, वीस दिवस वीजपुरवठा नव्हता अणि किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. शेकडो घरे वाहून गेली होती. त्यामुळे नवीन पुणे वसवण्याची गरज होती. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी निर्णय केला की, पुण्यालगत असलेल्या जागा ताबडतोब पूरग्रस्तांना द्याव्यात.
प्रथम ज्या पेठांमध्ये इमारती पडल्या होत्या; त्या सर्व पेठांमधील नागरिकांचे तात्पुरते निवारे उभे करणे गरजेचे होते. रस्त्यावरचा चिखल, दगड, माती साफ करून रस्ते पुन्हा व्यवस्थित करणे गरजेचे होते. यशवंतरावांनी जनतेला विश्वास दिला. दुस-याच दिवशी (13 जुलै) पंतप्रधान पंडित नेहरू पुण्यात आले. नेहरूंनी पाहणी केली. त्यांनीही जनतेला विश्वास दिला. विविध समित्या स्थापन करून वाताहत झालेल्या अनेक कुटुंबांची उभारणी करण्याचे काम यशवंतरावांनी हाती घेतले. बांधकाम क्षेत्रातील अनेकांना यशवंतरावांनी सहकार्याची विनंती करून शासकीय जमिनी ताबडतोब वाटपाला सुरुवात केली आणि नियोजनबद्ध आखणी करून पुण्यावर आलेल्या संकटावर यशवंतरावांनी मात केली. काळ अतिशय कठीण होता. पण, कुठेही विचलित होऊ न देता यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचे पुनर्वसन झाले आणि महाराष्ट्रावर आलेल्या एका संकटाचा सामना यशवंतरावांनी अतिशय हिमतीने केला.
त्या दुर्घटनेची तीव्रता अनुभवायची असेल तर त्या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. दुर्घटनेनिषयी वृत्तपत्रात वाचले असेल, वडिलधा-यांकडून ऐकले असेल, परंतु त्या भयाण पुराची तीव्रता जाणून घेण्याची इच्छा असेल तर ‘160, नारायण पेठ’ आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील ती खूण पाहण्यासाठी या ठिकाणी भेट द्यावीच ! या पुराच्या भयावह घटनेनंतर पुणे शहर विस्तारण्यास सुरुवात झाली.