कोरोना मृत्युदर रोखण्यासाठी; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची स्मार्ट युक्ती?
पुणे | कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज 9 जुलै जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्मार्ट सचूना दिल्या.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच छावणी परिषद, हवेली तालुका, ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी विशेष लक्ष द्या असं नवल किशोर राम यांनी बैठकीत ठणकावून सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि तपासणी प्रभावीपणे करा. कोरोना तपासणी अहवाल लॅबकडून 24 तासात मिळण्यासाठी प्रयत्न करा”, असंही नवल किशोर राम यांनी सांगितले. शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती घेवून हा अहवाल नियंत्रण कक्षाला वेळोवेळी कळवा. रुग्णांना बेड जलदगतीने मिळवून देण्यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित इंसिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी यांच्या समन्वयाने आवश्यक त्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवावे असेही यावेळी सांगण्यात आले