मुंबई | राज्य सरकारने 18 जिल्ह्यांना होम आयसोलेशन बंद करण्याच्या सूचना दिलेल्या असताना काही स्थानिक प्रशासनांनी हा नियम आपल्या शहरात लागू नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या नियमाबाबत गोंधळ आहे.
आतापर्यंत लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवलं जात होतं. म्हणजे त्यांना घरीच उपचार दिले जात होते. राज्य सरकारने होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतली. 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारने होम आयसोलेशन बंद ठेवल्या जाणाऱ्या 18 जिल्ह्यांची यादीही जारी केली. या यादीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड,हिंगोली, लातूर, नांदेड, अमरावती, अकोला, धुळे, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
याचा अर्थ तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल आणि तुमच्यामध्ये लक्षणं नसतील किंवा सौम्य लक्षणं असतील तरी तुम्हाला घरीच उपचार घेता येणार नाहीत, कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावं लागणार. पण अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही फिरत आहे, त्यामुळे कोरोना संसर्ग परसतो आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने होम आयोसेलेशनऐवजी संस्थात्मक आयसोलेशनवर भर देण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई आणि पुणे महापालिकेने मात्र आपल्या शहरात होम आयसोलेशन रद्द करण्यात आलं नसल्याचं सांगितलं. त्यामुळे नागरिकांमध्ये होम आयसोलेशनबाबतच्या नव्या नियमाबाबत गोंधळ निर्माण झाला.
दरम्यान सरकारने ज्या जिल्ह्यांमधील आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्ही सरासरी दर जास्त आहे तिथं संस्थात्मक आयसोलेसनवर भर देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि होम आयसोलेशनही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाच्या रेड झोनमध्ये असलेल्या 18 जिल्ह्यांना होम आयसोलेशन बंद करून कोविड सेंटर्स वाढवण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. बीएमसी आयुक्तांनी मुंबई शहरात होम आयसोलेशन कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण विशेषतः ग्रामीण भागात संस्थात्मक आयसोलेशनवर भर देणार असल्याचं म्हटलं आहे.
पुणे महापालिकेनंही होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नसल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारचा आदेशाची प्रत अद्याप मिळाली नाही तरी शहरात कोविड सेंटरला जाणं बंधनकारक नसल्याचं राज्य आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी महापालिकेला सांगितलं आहे, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली. पुणे शहरात ज्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था असेल, त्यांनी कोविड सेंटरला जाण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. पण ग्रामीण भागात मात्र काटेकोरपणे अंमलबजावणी होणार असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तसंच शासन प्रत आल्यावर निर्णय घेऊ, असंही त्या म्हणाल्या.