कुण्या आमदाराला-मंत्र्याला कोरोना झाला तर सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते; पत्रकारासाठी का हालली नाही?

पुणे | कुण्या आमदाराला-मंत्र्याला कोरोना झाला तर सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते. पण, पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनावर योग्य उपचार – सोई मिळाव्या म्हणून गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातले पत्रकार प्रयत्न करत असताना यंत्रणा हालली नाही. रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ शकली नाही, असा संताप पत्रकारांनी व्यक्त केला.
मनपाने करोडो रुपये खर्च करून ‘देवदूत’ विकत घेतल्या पण वेळेवर एकही रुग्णवाहिका मिळाली नाही. कोरोनाच्या उपचार केंद्रात काय चालले आहे हे रुग्णांच्या नातेवाईकांना कळत नाही. माहिती विचारण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क केला तर कोणी फोन उचलत नाही. फोन उचलला तर माहिती देत नाही. पांडुरंग यांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, डॉक्टरांच्या परवानगीने त्यांच्यासाठी पाठवण्यात आलेला जेवणाचा डब्बा आणि औषधे त्यांना अखेरपर्यंत मिळाली नाहीत. त्यांच्या बहिणीने आरोप केला आहे की, माझा दादा उपाशीच गेला. ही स्थिती बदलली पाहिजे अशी मागणी पत्रकारांनी केली.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर १८ दिवसात उभारले, असा दावा सरकार, मनपा करते पण हा सर्व देखावा आहे. या सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोई नाहीत, असा आरोप पत्रकारांनी केला. आवश्यक सोई निर्माण न करता अजित पवार यांनी हे जम्बो सेंटर सुरू करण्याची घाई का केली, असा प्रश्नही पत्रकारांनी केला.