Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू; चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Spread the love

नागपूर | अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील  यांनी बुधवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केले. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. मा. पाटील म्हणाले की, विदर्भात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काहीच हालचाल केलेली नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाचा जाब नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारला जाईल.

कांजूरमार्ग येथील मिठागराच्या जमिनीवरून सुरु असलेल्या वादाबाबत बोलताना मा. पाटील म्हणाले की आघाडी सरकार नियम, संकेत बाजूला ठेवून काम करत आहे. मिठागरांच्या जमिनीवर कार शेड उभे करायचे झाल्यास त्यासाठी प्रचंड खर्च येणार आहे, परिणामी मेट्रो प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे.

यावेळी मा. पाटील यांनी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. सोनिया गांधींच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. गांधी घराणे, काँग्रेस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात बोलणाऱ्या पत्रकारच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारच्या राजवटीत होत आहे, असे मा. पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version