पुणे | कोरोनावरील लस ‘कोविशिल्ड’चे चार-पाच कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले की, कोरोना व्हॅक्सिन ‘कोविशिल्ड’चे चार-पाच कोटी डोस सर्वांत आधी भारताला दिले जातील. तसेच काहीच दिवसांत कोरोनावरील लसीच्या वापरासाठी मंजुरी मिळेल आणि कंपनीने ही मंजुरी मिळण्यापूर्वीच लसीचे डोस तयार करून ठेवले आहेत.
अदर पूनावाला म्हणाले की, २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये लसींची कमतरता दिसून येईल. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्या लसींचा पुरवठा करण्यात सक्षम होतील. दरम्यान, किती प्रमाणात लसी हव्या आहेत आणि त्या किती वेळात हव्या आहेत, हे सरकार ठरवणार आहे. जुलै २०२१ पर्यंत लसींचे ३० कोटी डोस तयार करण्याचे आपले लक्ष्य आहे.