Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

अखेर बारामती नंतर इंदापुर तालुका लॉकडाऊनच्या जाळ्यात; 7 दिवस पूर्ण बंद!

Spread the love

इंदापूर | इंदापूर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढल्याने बारामतीपाठोपाठ इंदापूर तालुक्यातही कडकडीत लॉकडाऊन करण्याचा व तो 7 दिवस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारी संध्याकाळी पासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे.

यासाठी भरणे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. यामध्ये त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली व त्यांना त्यांचे मत विचारले. त्याची सुरवात आज सकाळीच त्यांनी जाचकवस्ती, बेलवाडी येथेही क्वारंटाईन सेंटरमध्ये भेट दिल्यानंतर तेथील पदाधिकाऱ्यांना विचारून केली होती. त्यांनी तेथेही पदाधिकाऱ्यांना लॉकडाऊनसंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी पदाधिकायांनी त्यांना लवकर व सर्व स्तरावर कडकडीत बंद करण्याची सूचना केली होती. त्यानंतर आज इंदापूरात ही बैठक झाली.

आता या निर्णयानुसार जाहीर केल्या जाणाऱ्या सात दिवसांच्या कालावधीत इंदापूर तालुक्यात अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त कोणतीही वाहने फिरणार नाहीत. भाजीपाला, मंडई किराणा दुकाने बंद राहतील. मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापना पूर्णतः बंद राहतील. या बैठकीस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, काँग्रेसचे स्वप्नील सावंत, तहसीलदार अनिल ठोंबरे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, सहायक निरीक्षक दिलीप पवार, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, भिगवणचे सहायक निरीक्षक जीवन माने आदींसह विविध पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version