डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
मुंबई | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. तसंच बाजारपेठांमध्येही तुफान गर्दी करताना नागरिक दिसताहेत. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारनं जारी केलेली अनलॉकची पाच टप्प्यातील पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. तसंच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असेही संकेत देण्यात आलेत.
कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात येईल. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.