कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! अनिल परब यांनी ठणकावलं!

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून (1 एप्रिल) कारवाई होणार, असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. दरम्यान, जे बडतर्फ झाले होते, ज्यांची सेवा समाप्ती झाली होती, आणि जे कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही, त्यांच्यावर आता कारवाई 1 एप्रिलपासून सुरु केली जाणार आहे. कंत्राटी कामगारांची भरती केली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच आता कंत्राटी पद्धतीवर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं अनिल परबांनी म्हटलंय. कोणकोणत्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आणि कुणाकुणाला दिलासा दिला जाणार, याबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अनिल परब यांनी म्हटलंय, की..
31 मार्चपर्यंतची मुदत आज संपतेय. आज संध्याकाळी माझ्याकडे आकडा येईल. जे हजर झालेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही! बडतर्फ, निलंबित होते, जे आज अर्ज घेऊन हजर झाले, त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार. आतापर्यंत 7 वेळा मी त्यांना हजर राहण्याचं आवाहन केलं होतं. असा समज झाला आहे की प्रशासन काहीच करत नाही. हेच पाहता आम्ही 11 हजार कंत्राटी कामगार नेमत आहोत. आमचे रुट्स पण फायनल झालेत, आमच्या 12 हजार फेऱ्या चालतात, त्या नवीन रचनेत बसतील ते सुरु होणार. आता जे कामावर येत नाही, त्यांना नोकरीची गरज नाही असा समज आहे, त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत.
न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नाही!
दरम्यान, अनिल परब यांनी पुढे बोलताना म्हटलंय की, 5 तारखेपर्यंत सेवा समात्त करु नका, असा कुठलाही आदेश न्यायालायाचा नाही. न्यायालयासमोर जो अहवाल ठेवला होता, त्यावर न्यायालयाने कॅबिनेटची मंजुरी मागितली होती. कॅबिनेटची मंजुरी आम्ही घेतली आहे, त्याचा ड्राफ्ट आम्ही कोर्टासमोर सादर करु, कोरोना काळातील स्टेटस मागितला होता, याबाबतचा सगळा डेटा सादर करु, अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
नियमानुसार जी कारवाई करायची असते, ती सर्व कारवाई आता केली जाईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामध्ये निलंबन असेल, बडतर्फी असेल वा सेवासमाप्ती असेल. आज शेवटचा दिवस होता. आमची एसटी कमिटी ठरवते, त्यानुसार ते कंत्राटी कर्मचारी भरले जाणार असल्याचंही अनिल परबांनी म्हटलंय. 5 हजार बस आता धावतात, त्यानंतर आता कंत्राटी कामगारांचा वापर करुन अजून 5 हजार बस चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत अनिल परब यांनी थेट संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ठणकावलं आहे.