पुणे | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांंचे सोमवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
सुमारे ५० ते ५५ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.