बारामती | रेमीडीसीवरच्या इंजेक्शन साठी संपूर्ण राज्यभरात अनेक जण हातापाया पडत असताना दुसरीकडे या संकटाची गैरफायदा घेत गोरखधंदा करत होते. बारामतीतील चौघेजण पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी करून रेमीडिसीवीरच्या मोकळ्या कुपीत भरून ते फेविकॉल च्या साह्याने पुन्हा बंद करत होते आणि विकत होते. बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत सावधपणे सापळा रचून चौघांना पकडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बनावट रेमीडिसिवर इंजेक्शन्स बाजारात असल्याबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले होते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी भवानीनगर येथील प्रशांत सिद्धेश्वर घरत (वय 23 वर्ष) शंकर दादा भिसे (वय 22 वर्षे) राहणार काटेवाडी तालुका बारामती या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन इंजेक्शन काल रात्री घेतली होती त्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर दिलीप ज्ञानदेव गायकवाड राहणार काटेवाडी हा तिसरा यातील आरोपी आढळून आला तर मुख्य सूत्रधार हा इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याची पोलिसांनी माहिती दिली. संदिप संजय गायकवाड हा मुख्य सूत्रधार असून तो वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करायचा. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
900 रुपयांचे असलेले रेमीडीसीवर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकले जात होते. याची माहिती मिळताच एका दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह चार जणांची टोळी या गोरख धंद्यासाठी पुढे सरसावली. दवाखान्यातील एक कर्मचारी रेमेडीसीवीर वापरून झाल्यानंतर त्या मोकळ्या कुपीमध्ये पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे पाणी भरून त्याला फेविक्विक लावून त्या बाटल्या पुन्हा बाजारात आणून विकत होता. बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शनच्या आवश्यकता होती त्यामुळे सतत संपर्क साधताना टोळीतील एका ची माहिती मिळाली त्यानुसार आठवणीतील एकाने इंजेक्शनची किंमत पस्तीस हजार रुपयाचे असल्याचे सांगितले. दरम्यान या औषधांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी यावर लक्ष ठेवले. काल रात्री शहरातील फलटण चौकात इंजेक्शन घेण्यासाठी या टोळीतील एका जणाला बोलल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व तो युवक आल्यानंतर प्रत्येकी इंजेक्शन 35 हजार रुपयांप्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतल्यानंतर पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर हा विकृत धंदा समोर आला.
दरम्यान आज उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नांगरे यांना या संदर्भात माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेत एक फॉर्म्युनर गाडी देखील जप्त करण्यात आली असून राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य सूत्रधार संदीप संजय गायकवाड हा रिकाम्या रेमेडीसीवीर कुपी आणून दिलीप गायकवाड याच्याकडे द्यायचा आणि दिलीप गायकवाड यामध्ये औषध भरून प्रशांत आणि शंकर हे दोघेजण सप्लाय करायचे. या इंजेक्शनची 35 हजार रुपये किंमत त्यांनी ठरवली होती. दरम्यान या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधन कायदा, औषधे किंमत अधिनियम आणि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.